नवनामकरण झालेल्या महाविकासाघाडी तर्फे मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावासाठी सहमती

मुंबई: मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांच्या नावावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीची सर्व संमती झाली असून उद्या संयुक्त पत्रकार घेऊन तसं जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसात राज्यातील राष्ट्रपती राजवट उठणार असल्याचं स्पष्ट आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाची आज वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये बैठक सुरू आहे. तब्बल सव्वा दोन तास चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मीडियाशी संवाद साधला. आघाडीचं सरकार कोणत्या मुद्द्यावर चालेल यावर संपूर्ण चर्चा करण्यात आली. या मुद्द्यांचं ड्राफ्टिंग सुरू आहे, असं सांगतानाच आजच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा निर्णय झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आमचा कोणताही संशय नाही. उद्धव यांच्याच नेतृत्वावर सर्वांची सहमती झाली आहे. त्यामुळे नेतृत्वाचा आणि मुख्यमंत्रिपदाचा विषय निकाली निघाला आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं. 

चर्चा योग्य दिशेने सुरू असून ही चर्चा अतिशय सकारात्मक झाली आहे. बऱ्याच गोष्टींवर आम्ही मार्ग काढले आहेत. मात्र चर्चा अद्याप सुरू असल्याने तुम्हाला कोणतीही अर्धवट माहिती देता येणार नाही. लवकरच आम्ही पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला त्याबाबतची माहिती देऊ, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.