
सिनेमाची सुरूवात छान आहे. चंपकलाल बन्सल यांना एक मुलगी. तिला लंडनमध्ये प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिकायला जायचं आहे. मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाप कंबर कसतो. स्थिती नसूनही तिला लंडनला न्यायचं ठरवतो. पण लंडन विमानतळावर उतरल्यानंतर केवळ इंग्रजीच्या घोळामुळे बापाला परत भारतात यावं लागतं आणि मुलगी इमिग्रेशन होऊन लंडनमध्ये जाते. मग तो बाप परत कसा तिकडे जातो.. त्याला त्यासाठी काय काय दिव्य करावे लागतात त्याची ही गोष्ट आहे.
या सिनेमातल्या अनेक सिच्युएशन्स ओढून ताणून आणल्या आहेत. ड्रगवरून झालेला शब्दांचा घोळ.. श्रीमंतांच्या डोनेशनच्या बोलीसाठी चोरली जाणारी पत्रिका.. दुबईवरून लंडन गाठण्याचा उद्योग हे सगळं हसवतं पण ते हस्यास्पद ठरतं. हिंदीवाल्यांना कदाचित अशी कॉमेडी नवी असेल पण आपल्याकडे टीव्हीवर रोज अशीच कॉमेडीी रचली जाते आणि तितकीच छान सादर केली जाते. पण तिचा हेतूच तो असतो. या सिनेमाचं मात्र उलटं झालं आहे. अशा अनेक प्रसंगांमुळे हा सिनेमा थिल्लर होतोय की काय वाटतं. आपलं हे वाटणं सिनेमा संपेपर्यंत खात्रीत बदलत नाही कारण, त्यात इरफान खान आहे. कमाल ताकदीने त्याने चंपकलाल बन्सल उभा केला आहे. त्याचे डोळे.. टायमिंग अफलातून आहे. त्याला तितकीच जबरदस्त साथ दिली आहे ती दिपक दोब्रियाल यांनी. शिवाय राधिका मदन, डिंपल कपाडिया, करीना कपूर, किकू शारदा ही सगळीच मंडळी आपआपल्या भूमिकेत चपखल बसली आहेत. म्हणूनच हा सिनेमा खिळवून ठेवतो. त्यात इरफानचे छोटे छोटे संवाद मजा आणतात. इरफान खान जबरदस्त !






