
मुंबई: आज दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्धव ठाकरे शपथविधीनंतर जनतेसमोर नतमस्तक झाले. उद्धव यांच्यानंतर शिवसेनेकडून शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर व्यासपीठावरील सर्वच मान्यवरपांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे हस्तांदोलन करत अभिनंदन केलं.






