आरे मेट्रो कारशेडला स्थगिती, पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई: ऐन निवडणुकीच्या काळात आरे कारशेडचा मुद्दा चांगलाच गाजला होता. कारशेडच्या कामासाठी रातोरात अडीच हजारच्या आसपास झाडे कापण्यात आली होती. यावर आमचं सरकार आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यानुसार त्यांनी पदभार स्वीकारताच आरेमधील कामाला स्थगिती दिली. याचं पुनर्परीक्षण केल्याशिवाय पुढील काम होणार नाही, असे निर्देश दिले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. कोणतीही विकासकामे रखडणार नाहीत, पण आपलं वैभव गमावून विकासकामे होणार नाहीत, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ही स्थगिती फक्त कारशेडच्या कामाला आहे. त्यामुळे मेट्रोचं काम सुरुच राहणार आहे.विधीमंडळ वार्ताहर कक्षात उद्धव ठाकरेंनी वार्तालाप केला. यावेळी सरकारची पुढची ध्येयधोरणं आणि दिशा त्यांनी स्पष्ट केली.