हैदराबादमधील बलात्काराच्या घटनेनंतर समाजात संताप

मुंबई: हैदराबाद येथे डॉक्टर महिलेवर बलात्कार करून तिला जिवंत जाळून टाकले. याघटनेने देशभरात समाजात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं ट्विट करून दुःख व्यक्त केलं आहे. ‘हैदराबादमध्ये जे घडलं, ते लज्जास्पद आहे. एक समाज म्हणून पुढे येऊन असे अमानवी कृत्यांचा विनाश करण्याची वेळ आली आहे,’ असं विराट म्हणाला. त्याआधी दिग्गज क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि भारताचा सलामीवीर शिखर धवन यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे.

हैदराबाद शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर शादनगर पोलीस स्टेशन आहे. या पोलीस ठाण्यात नराधम आरोपींना आणण्यात आल्याचं जमावाला कळलं. त्यासरशी शेकडोंच्या जमावाने आम्हाला न्याय हवाय, अशी घोषणाबाजी करतच पोलीस ठाण्याला घेराव घातला. विद्यार्थी आणि महिला यावेळी मोठ्या प्रमाणावर हजर होत्या. कोणताही तपास न करता, कोणतीही सुनावणी न करता या आरोपींना भरचौकात फाशी देण्याची मागणी करत जमावाने जोरदार निदर्शने केली. या नराधमांना समाजात कोणतेही स्थान नाही. एन्काउंटरमध्ये त्यांचा थेट खात्मा केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली.