कोणताही विकास प्रकल्प बंद होणार नाही – उध्दव ठाकरे

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात एका विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत राज्यातील सर्व पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. सुमारे चार तास ही बैठक चालली. त्यामुळे या बैठकीत मागच्या सरकारने सुरू केलेले प्रकल्प बंद करण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी दिवसभर चर्चा होती. मात्र बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: मीडियाशी संवाद साधून ही चर्चा फेटाळून लावली. सध्या राज्यात कोणते पायाभूत प्रकल्प सुरू आहे. त्यावर किती आर्थिक बोजा येऊ शकतो याचा आढावा घेण्यात आला. यावेळी हे प्रकल्प वेगाने पुढे नेण्याचा निर्णयही घेण्यात आला. प्रत्येक प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही एकही प्रकल्प बंद होऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं.