बलात्काराच्या आरोप असणारा स्वयं घोषित बाबा नित्यानंद याचा स्वतःचा देश स्थापन

नवी दिल्ली: बलात्काराचे आरोप झाल्यापासून स्वयंघोषित बाबा नित्यानंद फरार आहे. अहमदाबाद पोलिसांनी नित्यानंदच्या बंगल्यावरही शोधमोहिम केली, पण त्यांना तिथे काहीही मिळालं नाही. 

बलात्काराचा आरोप झाल्यापासून फरार असलेल्या बाबा नित्यानंदविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नित्यानंदने दक्षिण अमेरिकेतील देश इक्वॅडोरमध्ये एक बेट विकत घेतलं असून या बेटाला स्वतःचा स्वतंत्र देश घोषित केलं असल्याचा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. या देशाचे नाव कैलासा असे ठेवणयात आले आहे. या नावाने एक वेबसाईटही बनवण्यात आली आहे, ज्यात कैलासाला हिंदू राष्ट्र बनवण्यात आलंय.

कैलासाच्या वेबसाईटनुसार, हे बेट त्रिनिदाद आणि टोबॅगो देशांच्या जवळ आहे. यामध्ये एखाद्या देशातील व्यवस्थेप्रमाणे विविध सरकारी पदांवर लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, लष्कर प्रमुख आणि इतर पदांचा यात समावेश आहे. नित्यानंदने माँ नावाच्या एका निकटवर्तीयाला पंतप्रधानही नियुक्त केलं आहे. 

नित्यानंदने स्वतःच्या देशाचा झेंडाही तयार केला आहे. राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय फूल आणि राष्ट्रीय वृक्ष यांचीही घोषणा करण्यात आली आहे. कुणाला या देशाचा नागरिक व्हायचं असेल, तर देणगी देऊन येऊ शकता, असंही सांगण्यात आलं आहे.