देवाबगच्या समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

सिंधुदुर्ग: कल्याण परिसरातील पर्यटकांचा ग्रुप देवबाग येथे आला होता. आज दुपारी नौकाविहार करत असतानाच साडेबारा वाजताच्या सुमारास ही पर्यटक नौका सोसाट्याचा वाऱ्यामुळे एका बाजूला कलंडली आणि नौकेतील ९ पर्यटक खाडीपात्रात पडले. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक मच्छिमारांनी प्रसंगावधान दाखवत धाव घेतली व पाण्यात बुडालेल्या सर्व पर्यटकांना बाहेर काढले. या सर्वांना तातडीने मालवणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचारापूर्वीच माया माने या वृद्धेचा मृत्यू झाला तर अनया अमित अडसुळे (बदलापूर) ही ३ वर्षांची चिमुकली गंभीररित्या जखमी असून तिची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचे सांगण्यात आले.

कोकण किनारपट्टीवर वादळाचा इशारा देण्यात आला असून किनारपट्टी व खाडीपट्ट्यात सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्याचाच फटका पर्यटकांच्या नौकेला बसला व ही नौका कलंडून दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. देवबाग संगम खाडीपात्रात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

maharashtra times