
हैदराबाद: गेल्या आठवड्यात हैदराबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर अत्याचार करून चौघांनी त्यांची हत्या केली होती. देशभरातून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत होता. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरत होती.
यादम्यान आरोपींना पोलिस तपासासाठी वाहनातून घेऊन जात असताना, पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिकार केला यात पोलीसांनी गोळ्या झाडल्या. यात चारही आरोपी ठार झाले असल्याचे समजते.
ही घटना आज (शुक्रवार) पहाटे ३ वाजता घडली. हैदराबादमध्ये एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिला ठार मारण्याचा या चार आरोपींवर आरोप होते. बलात्कार आणि हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
आरोपींनी पोलिसांच्या हातातील शस्त्रे खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती तेलंगणचे कायदेमंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली.






