
पुणे: गायीच्या दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर 2 रुपये दराने तर खरेदीदरात सध्या 1 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक कल्याणकारी संघाने घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना सोमवारपासून गायीच्या दुधाच्या एका लिटरसाठी जादा 2 रुपये द्यावे लागणार आहेत. परिणामी, एक लिटर दुधासाठी आता 44 ऐवजी 46 रुपये मोजावे लागणार आहेत तसेच शेतकर्यांना 28 वरून 29 रुपये दर मिळणार आहे. शेतकर्यांना आणखी 1 रुपया वाढवून मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पिशवीतील दूध विकणार्या सहकारी संस्थांचा प्रती लिटर दोन रुपयांनी विक्रीचा दर वाढविण्याचा प्रस्ताव होता. त्याबाबत दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची शनिवारी पुण्यात बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयाची दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी माहिती दिली.






