
नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे. २ लाखापर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे. आज विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्र्यांची याची घोषणा केली. महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत ही कर्जमाफी दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात याची घोषणा आज मुख्यमंत्र्यांनी केली. 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे थकीत कर्ज माफ केले जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ही कर्जमाफी योजना येत्या मार्च महिन्यापासून लागू होणार आहे. या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अटी नाहीत. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना कुठेही हेलपाटे घालावे लागणार नाही.
नियमित कर्जाचे हफ्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील लवकरच मोठी घोषणा करण्यात येईल’, असं आश्वासन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी २ लाखापर्यंतच्या कर्जमाफीवर मात्र भाजपने आक्षेप घेतला आहे. तुम्ही सातबारा कोरा करणार असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे ते आश्वासन तुम्ही पाळावं असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदतीचं आश्वासन तर पाळलंच नाही. पण ही कर्जमाफी देखील पुरेशी नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. यानंतर याचा निषेध करत विरोधीपक्षाने सभात्य़ाग केला.

अर्थमंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस आणि भाजपचा चांगला समाचार घेतला. आम्ही थेट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करणार आहोत. कोणालाही अर्ज भरण्याची गरज नाही. रांगेत पत्नीसोबत उभे राहवे लागणार नाही, असे जयंत पाटील म्हणालेत. जे आधीच्या सरकारला जे जमले नाही ते आम्ही करुन दाखवले आहे. शेतकऱ्यांच्या पीककर्जाबद्दल आम्ही ही भूमिका घेतली आहे, असे ते म्हणालेत.

दरम्यान, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्यात, जे विदर्भाच्या सुपुत्राला करता आले नाही. या सुपुत्राने सभात्याग केला तर नातवाकडून न्याय देण्यात आला आहे. विरोधक प्रत्येक गोष्टीत खो घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ते बघवत नाही.






