मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते पुणे मेट्रो कोचचे अनावरण

मुंबई: पुणेकर आतूरतेने प्रतीक्षा करत असलेल्या पुणे मेट्रोच्या कोचचे अनावरण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृहात झाले. याप्रसंगी नगरविकासमंत्री व गृहमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

पुणे मेट्रो कोचाच्या  प्रतिकृतीचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी येथे झाले. या मेट्रोची प्रत्येक गाडी ही तीन कोचची असून, एका गाडीतून ९५० ते ९७० प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात. तीन कोचपैकी एक कोच महिलांसाठी राखीव असून तीनही कोच आतून एकमेकांना जोडलेले असल्यामुळे प्रवाशांना सहज एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाणे शक्य होणार आहे. स्टेनलेस स्टीलने बनवलेले हे कोच वजनाला हलके असून यामध्ये अत्याधुनिक एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. बाहेरील प्रकाशानुसार या दिव्यांची तीव्रता कमी-अधिक करणारी यंत्रणाही यात बसवण्यात आली आहे. ताशी कमाल ९० किमी वेगाने धावू शकणाऱ्या या गाडीच्या कोचमध्ये प्रवाशांसाठी मोबाइल व लॅपटॉप चार्जिंग सुविधा पुरवण्यात आली असून, दृकश्राव्य संदेशप्रणाली असणार आहे.