
मुंबई: केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व कायदा, एनसीआर, एनपीआरवरून देशभरात विरोधकांनी आंदोलन पुकारले आहे. हा कायदा देशविरोधी नाही, हे सांगण्यासाठी देशभरात भाजपने रॅली, व सभा घ्यायला सुरुवात केली आहे. आज मुंबईत नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ सभा व रॅलीचे आयोजन केले होते. परंतु, भजपच्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे भाजपला रॅली न काढता थेट ऑगस्ट क्रांती मैदानावर सभा घ्यावी लागली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
नागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यापासून आम्हाला कुणीच रोखू शकत नाही. जाळपोळ करणाऱ्यांना सरकारकडून परवानगी मिळतेय. परंतु, आम्हाला परवानगी नाकारली जाते. राज्यातील सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर जोरदार हल्ला चढवला.






