
नवी दिल्ली: ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेवरून काही दिवसांपूर्वी वाद रंगला होता. झरीनने मेरी कोम हिच्या विरोधात ट्रायलची मागणी करून खळबळ उडवून दिली होती. मेरी कोमने सांगितलं होतं की बॉक्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएफआय) धोरणाचं आपण पालन करू. बीएफआयने शेवटी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. या वादाची पार्श्वभूमी अशी की बीएफआय अध्यक्ष अजय सिंह यांनी एका कार्यक्रमात जाहीर केलं होतं की मेरी कोमच्या सातत्यपूर्ण उत्तम कामगिरीमुळे तिला कोणत्याही चाचणीशिवाय ऑलिम्पिकसाठी पात्र ठरवले जाईल. यावर नाराज होत झरीनने तिला संधी देण्याची मागणी केली होती.
सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या बॉक्सर मेरी कोमचा पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता सामन्यात निखत झरीनशी मुकाबला होणार आहे. महिला मुष्टीयोद्धा चाचणीच्या ५१ कि.ग्रॅ. गटात या दोघींचा अंतिम सामना रंगणार आहे. दोघींनी शुक्रवारी आपल्या पहिल्या टप्प्यातल्या स्पर्धांमध्ये विजय मिळवला.











