ठाकरे सरकार खातेवाटप रखडलेलेच

मुंबई: महाराष्ट्र विकासआघाडी सरकारचे खाते वाटप आजही बारगळलेच आहे. तिन्ही पक्षांच्या चर्चेचे गुऱ्हाळ काही केल्या संपेनाच असे दिसून येत आहे. जास्तीच्या खात्यावरुन काँग्रेसने ताणून धरल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस आणि शिवसेनेत खातेवाटपाबाबत चर्चा सुरुच असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. काँग्रेस जास्तीत जास्त खाती आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी दबाव आणत आहे. त्यामुळे सगळं ठरले असताना खातेवाटप जाहीर होण्यास उशिर होताना दिसत आहे. 

२८ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मात्र या सरकारचे खातेवाटप व्हायला अनेक दिवसांचा कालावधी जावा लागला. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती मंत्रिमंडळ विस्ताराची. विस्ताराच्या तारखांवर तारखा गेल्यानंतर आता ३० डिसेंबर ही तारीख निश्चित झाली होती. मात्र विस्ताराआधी पुन्हा खात्याच्या वाटपांवरून महाराष्ट्र विकास आघाडीत नाराजी नाट्य सुरू झाले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण खातेवाटपाचे घोडे अजून अडलेले दिसून येत आहे.