
गुवाहाटी : भारत विरुद्ध श्रीलंका टी – २० सामना पावसामुळे अखेर रद्द करण्यात आला. दोन्ही संघांदरम्यान होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेतला रविवारचा हा पहिला सामना होता. गुवाहाटीतील बारसपरा मैदानात हा सामना होणार होता. सामन्याआधी नाणेफेक वेळेत झाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र नंतर पाऊस सुरू झाल्याने सामना सुरू होऊ शकला नाही.
आजचा सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होणार होता. टॉस सायंकाळी साडेसहा वाजता झाला. मात्र नंतर पाऊस सुरू झाला. मैदान खूप ओले झाले होते. पाऊस नंतर थांबून थांबून विश्रांती घेत पडत होता. रात्री साडे नऊ वाजता पंचांनी खेळपट्टीचं निरीक्षण केलं आणि त्यानंतर थोड्यावेळाने सामना रद्द झाल्याचं जाहीर केलं. तीन सामन्यांपैकी दुसरा सामना इंदुर येथे ७ जानेवारी रोजी खेळला जाणार आहे.











