आय सी सी कडून क्रिकेटमधील पुरस्कार जाहीर

दुबई: आयसीसीने बुधवारी २०१९मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंना पुरस्कार जाहीर केले. ‘वनडे क्रिकेटर ऑफ इअर’साठी भारताच्या रोहित शर्माची निवड करण्यात आली. रोहितने गेल्या वर्षी २८ सामन्यात १ हजार ४९० धावा केल्या. यापैकी ६४८ धावा इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कपमधील ६ सामन्यात केल्या होत्या. तर विराट कोहलीला ‘स्पिरीट ऑफ क्रिकेट’ हा पुरस्कार देण्यात आला. वर्ल्ड कपमधील एका सामन्यात स्टिव्ह स्मिथचे कौतुक करताना विराटने टाळी वाजवली होती. विराट फलंदाजी करत असताना सीमा रेषेवर फिल्डिंग करणाऱ्या स्मिथला प्रेक्षक चिडवत होते. प्रेक्षकांचे हे वर्तन विराटला आवडले नाही. त्याने हाताने इशारा करत नाराजी व्यक्त केली आणि स्मिथसाठी टाळ्या वाजवण्यास सांगितले.

ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लबूशेन यांची Emerging Cricketer पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कसोटीमध्ये गेल्या वर्षी ५९ विकेट घेणाऱ्या पॅट कमिन्स याची ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ द इअर’ या पुरस्कारासाठी निवड झाली. दीपक चहरला टी-२०मधील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार देण्यात जाहीर झाला.

दीपकने नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात ७ धावा देत ६ विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात दीपकने हॅटट्रिक घेतली होती. टी-२०मध्ये भारताकडून हॅटट्रिक करणारा तो पहिला गोलंदाज ठरला होता.