Amazon करणार 1 अब्ज अमेरिकन डॉलरची भारतात गुंतवणूक, 10 लाख नवीन रोजगार निर्मितीचे लक्ष

नवी दिल्ली: भारतात येत्या पाच वर्षांच्या कालावधीत १ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार असल्याच्या घोषणेनंतर अॅमेझॉनने आता रोजगारनिर्मितीबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. अॅमेझॉनतर्फे भारतात येत्या ५ वर्षांत १० लाख नवे रोजगार निर्माण केले जातील, असे भारतभेटीवर आलेले अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांनी शुक्रवारी सांगितले. तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा व दळणवळण क्षेत्रात अॅमेझॉनकडून होणाऱ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून हे रोजगार उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.

आमच्या मंचावरून विकल्या जाणाऱ्या उत्पादनांना येथील ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे भविष्यात येथे व्यवसायविस्तार करण्याचे उद्दिष्ट कंपनीने आखले असून त्यातून स्थानिक तरुणांना रोजगार व देशी व्यावसायिकांना बाजार उपलब्ध होईल, असे बेझोस म्हणाले.