
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीचा उल्लेख साईबाबांचे जन्मस्थळ असा करून पाथरीसाठी विकास योजना जाहीर केली होती. त्यामुळे वादाला तोंड फुटले होते. पाथरी नव्हे तर शिर्डी हेच साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचे सांगत शिर्डीकरांनी बेमुदत शिर्डी बंद पुकारला होता. याप्रश्नी चर्चेअंती तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्याचवेळी बंद मागे घेण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली होती. या विनंतीला मान देत शिर्डीकरांनी रविवारी रात्री बंद मागे घेतला होता. दरम्यान, या प्रश्नावर आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात तातडीने बैठक घेतली व वादावर यशस्वी तोडगा काढला.
शिर्डी व पाथरीकरांनी आजच्या बैठकीत सामोपचाराची भूमिका घेतली. साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नाही तर तीर्थक्षेत्र म्हणून पाथरीचा विकास होणार असेल तर त्यास आमची कोणतीही हरकत नाही, अशी भूमिका शिर्डीतील ग्रामस्थ प्रतिनिधींनी बैठकीत मांडली. ही भूमिका दोन्ही बाजूने मान्य झाली. मुख्यमंत्र्यांनीही पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ हा उल्लेख मागे घेतला. ‘पाथरी तीर्थक्षेत्र विकास’ हे नाव योजनेसाठी निश्चित झाले आणि वाद संपुष्टात आला. ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून बैठकीसाठी उपस्थित राहिलेले खासदार सदाशिव लोखंडे यांनी बैठकीबाबत समाधान व्यक्त केले.






