भारतीय क्रिकेट संघाला धक्का: दुखापतीमुळे रोहित शर्मा संघाबाहेर

न्यूझीलंड: नुकत्याच संपलेल्या T20 मालिकेत न्यूझीलंडला 5-0 ने व्हाईट वॉश देणाऱ्या भारतीय संघाला विलक्षण धक्का दिला. न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका ५-० ने जिंकल्यानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. न्यूझीलंडविरुद्ध अंतिम टी-२० सामन्यात रोहित शर्माने लोकेश राहुलसोबत संघाचा डाव सावरताना ६० धावांची खेळी केली होती. मात्र फलंदाजीदरम्यान त्याच्या पोटरीचे स्नायू दुखावल्यामुळे त्याने फिजीओच्या मदतीने मैदान सोडणं पसंत केलं. विराटच्या अनुपस्थितीत रोहित भारतीय संघाचं नेतृत्व करत होता, पण तो देखील दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतर लोकेश राहुलने संघाचं नेतृत्व केलं. पीटीआय वृत्तसंस्थेने यासंदर्भातली माहिती दिलेली आहे.

शुभमान गिल

रोहित शर्माच्या जागेवर भारतीय कसोटी संघात युवा शुभमन गिलची भारतीय संघात निवड झाली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. भारत अ संघाकडून खेळत असताना कसोटी सामन्यात शुभमन गिलने नाबाद २०४ धावांची खेळी केली. या खेळीमुळे कसोटी मालिकेसाठी शुभमन गिलला प्राधान्य देण्यात आलेलं आहे.

मयांक अग्रवाल

याचसोबत वन-डे मालिकेसाठी मयांक अग्रवालची संघात निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईकर पृथ्वी शॉला वन-डे संघात सलामीला येण्याची संधी मिळू शकते. शिखर धवनऐवजी पृथ्वी शॉची भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. बुधवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे.

पृथ्वी शॉ