U19: आज भारत विरुद्ध बांगलादेश फायनल

द. आफ्रिका: विश्वचषकाच्या आजवरच्या इतिहासात भारताच्या कामगिरीचा आलेख हा नेहमीच चढत्या भाजणीचा राहिलाय. 2000 साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा युवा विश्वचषक पटकावला. त्यानंतर विराट कोहली, उन्मुक्त चंद आणि पृथ्वी शॉच्या भारतीय संघानं भारताला विश्वचषकाचा मान मिळवून दिला.

भारताची युवा ब्रिगेड 2000, 2008, 2012, 2018 आणि आता 2018 पाचव्या विश्वविजेतेपदासाठी सज्ज झाली आहे. पाकिस्तानचा धुव्वा उडवून भारताने सलग तिसऱ्यांदा अंडर-19 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. आता या युवा शिलेदारांचा सामना पहिल्यांदाच फायनल गाठलेल्या बांगलादेशशी होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ सुपर फॉर्मात आहे. आतापर्यंत झालेल्या साखळी आणि बाद फेरीच्या पाचही सामन्यात भारताने प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातही त्याच आत्मविश्वासाने सामोरं जाण्याचा युवा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.

दक्षिण आफ्रिकेतल्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय संघाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. आजवरच्या इतिहासात भारताने चारवेळा अंडर-19 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. यंदाच्या विश्वचषकात बांगलादेशच्या तुलनेत भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रियम गर्गची युवा ब्रिगेड अंडर-19 विश्वचषकावर पाचव्यांदा भारताचं नाव कोरेल ?