राज्य सरकारी कर्मचारी वर्ग यांना खुशखबर, पाच दिवसांच्या आठवड्याला मंजुरी

शाळांनीही निर्णय लागू करण्याची शिक्षक संघटनांची मागणी

मुंबई:  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. येत्या 29 फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळं शनिवार आणि रविवारी सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे. सरकारी कर्मचारी आणि अधिकारी सध्या दिवसाला आठ तास काम करतात. पाच दिवसांचा आठवडा झाल्यावर कर्मचाऱ्यांना दररोज 45 मिनिटं जास्त काम करावं लागणार आहे.

राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना शनिवार रविवार सुटी असणार आहे. म्हणजे कामाचे दिवस हे सोमवार ते शुक्रवार असणार आहेत. यात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, तसेच महाविद्यालयांचा समावेश नसणार आहे. पण याच निर्णयाप्रमाणे शाळांना देखील रविवारच नाही तर शनिवारी सुटी देऊन, कामकाजासाठी 5 दिवसांचा आठवडा ठेवा, अशी मागणी करण्यात आली आहे.