नमस्ते ट्रम्प: अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं भारतात आगमन, जल्लोषात स्वागत

अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यश्र डोनाल्ड ट्रम्प donald trump यांनी सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भारतीय भूमीवर पाऊल ठेवलं. एअर फोर्स वनच्या एका विमानाने ते सपत्नीक भारतात आले. यावेळी त्यांची मुलगी आणि जावईही सोबत होते. अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर ट्रम्प यांचं आगमन झालं आणि मोठ्या उत्साहात त्यांच्या भारत दौऱ्याची सुरुवात झाली. 

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं स्वागत केलं. त्यांच्या स्वागतासाठी इतरही मान्यवरांची उपस्थिती होती. शिवाय भारतीय संस्कृतीची झलकही ट्रम्प यांच्यापुढे सादर करण्यात आली. एकिकडे विमानतळावर शासकीय स्वागताचा स्वीकार करत असतानाच दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांचं सोशल मीडियावरही धडाकेबाज अंदाजात स्वागत करण्यात आलं. 

महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमाला भेट, सपत्नीक उपस्थिती

भारत दौऱ्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वप्रथम महात्मा गांधीजींच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. तिथे पंतप्रधान मोदी आणि साबरमती आश्रमातर्फे खादीचं उपरणं भेट देऊन ट्रम्प यांचं स्वागत केलं. आश्रमाबाहेर पंतप्रधान मोदी, स्वतः डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी पायातले बूट काढून महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला खादीचा हार अर्पण करत वंदन केलं. बापूजींच्या कार्याविषयी आणि साबरमती आश्रमाविषयी नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना थोडक्यात माहिती सांगितली. त्यानंतर आश्रमातल्या कक्षाची ट्रम्प यांनी पाहणी केली. 

साबरमती आश्रमात असलेल्या बापूजींच्या चरख्याची माहिती ट्रम्प यांना मोदींनी दिली. चरख्याचं भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतलं महत्त्व सांगितलं. त्यानंतर चरख्यावर सूतकताई कशी करतात याचं प्रात्यक्षिक स्वतः ट्रम्प आणि मेलानिया यांनी अनुभवलं. ट्रम्प यांनी स्वतःच्या हाताने चरखा चालवला. आश्रमातल्या कर्मचाऱ्यांनी ट्रम्प यांना सहाय्य केलं.

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानला इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्यावर असताना पाकिस्तानला इशारा दिला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं की, आपले देश इस्लामिक दहशतवादाचे शिकार ठरले आहेत. ज्याच्या विरोधात आपण लढत आहोत. अमेरिकेने कारवाई करत इराक आणि सीरीयामधून ISIS ला संपवलं. आम्ही अल बगदादीचा खात्मा केला. आम्ही दहशतवादाच्या विरोधात कडक कारवाई करत आहोत. पाकिस्तानवर ही दबाव टाकला आहे. पाकिस्तानला दहशतवादाच्या विरोधात कारवाई करावीच लागेल. प्रत्येक देशाला स्वतःला सुरक्षित करण्याचा अधिकार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, मी उद्या पंतप्रधान मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहोत. ज्यामध्ये अनेक करारावर चर्चा होणार आहे. भारत आणि अमेरिका डिफेंसच्या क्षेत्रात पुढे जात आहे. आम्ही भारताला सगळ्यात खतरनाक अशा मिसाईल आणि हत्यारं देऊ. अमेरिका-भारत दोघं ही एकत्र दहशतदाच्या विरोधात लढू. इस्लामिक दहशतवादाच्या विरोधात अमेरिका लढत आहे.

ट्रम्प यांनी म्हटलं की, भारतात आज हिंदू, जैन, मुस्लीम, शीखसह अनेक धर्माचे लोक एकत्र राहतात. येथे अनेक भाषा बोलल्या जातात. तरी देखील येथे लोकं एका शक्ती प्रमाणे राहतात. अमेरिकेत मुळच्या भारतीय लोकांनी विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.