
लखीमपुर खीरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Violence) प्रकरणी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) आक्रमक भूमिका घेतली असून याच्या निर्षेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची (Maharashtra Government) हाक दिली आहे. त्याचबरोबर उद्या (सोमवार, 11 ऑक्टोबर) काँग्रेस नेते राजभवानासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या बंदमध्ये सहभागी होऊन बंद पूर्णपणे यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून त्यांची हत्या केली. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणात अत्यंत बेजबाबदारपणा दाखवला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कायदा व सुव्यवस्था नसून रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट सुरु आहे, असे नाना पटोले म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, या प्रकारानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी शेतकऱ्यांना भेटण्यास जात असताना त्यांना अडवण्यात आले. त्यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनाही शेतकऱ्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली. त्याचबरोबर काँग्रेस खासदारला पोलिसांनी धक्काबुक्की केली. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने लोकशाही व संविधानाचा गळा घोटला आहे.

महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत उद्या (11 ऑक्टोबर) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही यासाठी सहमती दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, व्यापारी वर्गात बंदला पाठींबा देण्यावरुन संमिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत.
महाराष्ट्र बंदला पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा
महाविकासआघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला आहे. महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद राखा यांनी ही माहिती दिली. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांची अनेक संघटना असलेल्या रिटेल व्यापारी संघाने मात्र उद्याच्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या हत्येचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावून ते काम सुरूच ठेवणार असल्याचं रिटेल व्यापारी महासंघाकडून सांगण्यात आले आहे.
अभिनेते सयाजी शिंदे यांचा बंदला पाठींबा
अभिनेता सयाजी शिंदे यांनी लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला असून उद्याच्या बंदला पाठिंबा दर्शवला आहे.
बंदमध्ये शिवसेना अग्रेसर असणार : एकनाथ शिंदे
विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आले असता पत्रकारांशी बोलताना म्हणाले की उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना अग्रेसर असणार असून महाविकास आघाडीतर्फे निषेध म्हणून उद्याचा बंद यशस्वी करणार आहे.
नागपूर येथील व्यापाऱ्यांनी विरोध
उद्याच्या महाराष्ट्र बंदच्या महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या हाकेला नागपूर येथील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने आम्हाला उद्याचा बंद पाळता येणार नाही, असं जाहीर केलंय. सणासुदीचे दिवस असून एक दिवसही बाजार बंद ठेवणे कठीण आहे, एक दिवस दुकान बंद असले तरी ग्राहक ऑनलाईनचे पर्याय निवडत आहे, त्यामुळे ज्यांना या समर्थनात बंद ठेवायचे आहे, त्यांनी ठेवावे, पण ज्यांचा या बंदला पाठिंबा नाही त्यांचे दुकान जबरदस्तीने बंद ठेवू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी आशा नाग विदर्भ चेम्बर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी व्यक्त केली.






