
पुणे : पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. सदर रुग्ण नायडू हॉस्पिटल, पुणे येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी एका रूग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहे. तर दुस-या रुग्णामध्ये अद्याप लक्षणे आढळून आली नाहीत. सदर रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेवून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. तथापि, नागरिकांनी घाबरुन जाण्याची काहीही कारण नाही.
पुण्यातील पती – पत्नी 1 मार्च रोजी दुबईवरुन पुण्यात आले. हे दोघे एका ट्रॅव्हल एजन्सी मार्फत दुबईला पर्यटनासाठी गेले होते. मात्र एक तारखेला ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांच्यामधे कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. त्यामुळे ते त्यांच्या घरी गेले. मात्र आज त्यांना त्रास होऊ लागल्याने हे पती पत्नी तपासणीसाठी महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमधे पोहचले. त्यानंतर त्यांची सॅंपल्स टेस्टिंगसाठी एन आय व्ही कडे पाठवण्यात आली असता ती पॉझिटीव्ह आढळली. हे दोघे पती पत्नी दुबई वरुन आले तेव्हा त्यांच्यामधे कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती आणि दुबईमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं तोपर्यंत दिसून आलेलं नव्हतं. त्यामुळे या दोघांबरोरच ते ज्या चाळीस जणांबरोबर दुबईला गेले होते त्यापैकी कोणाच्याच टेस्ट करण्यात आल्या नाहीत असं स्पष्टीकरण पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलंय.
मात्र आता हे पती पत्नी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने ते ज्यांच्यासोबत दुबईला गेले होते त्या 40 जणांच्याही टेस्ट कराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर कोरोना पॉझिटीव्ह आढळलेले हे दोन पती – पत्नी मागील आठ दिवसांमध्ये ज्यांच्या संपर्कात आले असतील अशा सर्वांचा शोध घ्यावा लागणार असल्याचं आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय.






