Operation Lotus: काँग्रेसला मोठा धक्का, ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

नवी दिल्ली:

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा बसला आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यानंतर 19 आमदारांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काही वेळापूर्वीच ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली होती. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील सोबत होते. त्यामुळे ज्योतिरादित्य भाजपमध्ये प्रवेश करणार अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये जाणार आहेत. भाजपच्या कोट्यातून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याचंही कळत आहे. दोन दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांची भाजपच्या नेत्यांशी यासंदर्भात चर्चा झाल्याचं समोर येत आहे. या चर्चेनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या फॉर्म्युल्यावर सहमती झाल्याचं कळतंय.

Operation Lotus: गेल्या काही तासांपासून मध्य प्रदेशात सुरु असलेले हे राजकारण आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. काहीवेळापूर्वीच ज्योतिरादित्य सिंधिया भाजप नेते अमित शहा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याचे समजते. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया हे भाजपमध्ये जाणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ज्योतिरादित्य सिंधिया आपल्या गटाचे आमदार घेऊन भाजपसोबत गेल्यास मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पडेल. भाजपकडून सिंधिया यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन केंद्रात पाठवले जाण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रात त्यांना मंत्रिपद देऊन राष्ट्रीय राजकारणात त्यांचा वापर केला जाऊ शकतो.