
मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ Chala Hawa Yeu Dya या कार्यक्रमाला आजवर प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली. पण, सध्या मात्र प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या या कार्यक्रमाने अनेकांचा रोष ओढावला आहे. हा रोष ओढावण्यामागचं कारण म्हणजे कार्यक्रमातील एका भागातून व्हायरल होणारा एक फोटो. ज्यामध्ये या कार्यक्रमातील कलाकार हे राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या रुपात असल्याचं भासवण्यात आलं होतं.
व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्याऐवजी कलाकारांचे चेहरे लावण्यात आल्यामुळे हे महापुरुषांची प्रतिमा मलिन करणारं कृत्य असल्याचं म्हणत अनेकांनी संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर कार्यक्रमाविरोधात पोस्ट लिहिल्या गेल्या. खुद्द छत्रपती संभाजी राजे यांनीही या प्रकरणी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाविषयी निर्माण झालेलं हे वातावरण पाहता अखेर निलेश साबळेने झी मराठी वाहिनीच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये निलेश झाल्या प्रकरणी स्पष्टीकरण देत असून, खरी गोष्ट सर्वांपुढे मांडत आहे. सोबतच ही तांत्रिक चूक असल्याचं म्हणत दिलगिरीही व्यक्त करत आहे.






