
मुंबई / सांगली: राज्यात कोरोना बाधितांची संख्या ही सतत वाढत असल्याचे दिसून येत आहे. सांगलीमध्ये आणखी 4 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 97 झाली आहे. सांगलीतील हे चारही रूग्ण देवदर्शनासाठी सौदी अरेबिया येथे गेले होते. या चौघांवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील 4 प्रवासी सौदी अरेबिया (उमराह) येथे यात्रेसाठी गेले होते. हे चौघे नुकतेच 14 मार्चला प्रवास करून परतले होते. त्यानंतर ते आयसोलेशन वार्डमध्ये होते. त्यांचे स्वॅब नमुना शनिवारी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आज त्याचे रिपोर्ट जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत. या चारही प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यातील परदेशातुन आतापर्यंत 490 प्रवासी परतले आहेत. ज्यामध्ये 12 जण आयसोलेशन वार्डमध्ये आहेत. त्यापैकी 4 जन आता कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. तर 465 जण होम क्वारंटाईन आहेत.






