कोरोनाचा अंधार दूर करण्यासाठी 5 एप्रिलला घरात दिव्यांचा प्रकाश करा : पंतप्रधान नरेन्द्र मोदी

नवी दिल्ली:

देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक व्हिडीओ संदेश प्रसारित केला. कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल, रविवारी घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 5 एप्रिल, रविवारी रात्री 9 वाजता आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल. मात्र हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील आपल्याला करायचं आहे, असं मोदी म्हणाले.

हे आयोजन करताना कुणीही एकत्र यायचं नाही. रस्त्यावर, गल्लीत एकत्र जमायचं नाही, असं मोदी म्हणाले.

दरम्यान आज पंतप्रधान लॉक डाऊन बद्दल काही उपाय योजना तसेच कोरोना संबधित देशातील स्थितीवर भाष्य करतील अशी अपेक्षा होती. तसेच देशाच्या विविध भागांत पोलीस, डॉक्टर आणि नर्सेस यांच्यावर होत असलेल्या हल्या बाबत बोलतील अशी आशा होती. भारत सरकारच्या वतीने कोरोना विरुद्ध लढण्यासाठी काय तयारी करण्यात आली आहे व नागरिकांनी घाबरु नये असा विश्वास निर्माण करणे अपेक्षित होते परंतु टाळ्या वाजवून झाल्या नंतर आता परत एकदा एक वेगळा दिवे लावण्याचा इव्हेंट साजरा करण्यास सांगून लोकांची निराशा केली असेच म्हणावे लागेल. उद्देश कितीही चांगला असला तरी वारंवार असे इव्हेंट साजरे करून कोरोना विरुद्धाची लढाई जिंकता येत नाही म्हणून पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या कडून काही ठोस उपाय योजना अपेक्षित होत्या अशीच जन मासात भावना व्यक्त होत आहे.