बारावीचा अभ्यासक्रम पीडीएफच्या माध्यमातून उपलब्ध करणार : वर्षा गायकवाड

पुणे : बारावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमांचे पीडीएफ संकेतस्थळावर देण्याविषयी चर्चा झाली आहे. लवकरच त्याची कार्यवाही करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा अभ्यासक्रम यावर्षी बदलला खरा; पण त्याची पुस्तके मिळणार कधी हा प्रश्न शाळांना पडला आहे. त्यामुळे ही पुस्तक पीडीएफद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शालेय शिक्षण विभाग दरवर्षी टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रमांमध्ये बदल करत आहे. गेल्यावर्षी अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल झाला होता. नव्या धोरणानुसार परीक्षा या प्रश्नपत्रिका नव्हे; तर कृती पत्रिकांच्या आधारे घेतल्या जाव्यात, असा उद्देश समोर ठेवून अभ्यासक्रमाची फेररचना करण्यात येत आहे.

दहावीच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप देखील बदलण्यात आले. त्यानंतर अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल झाला होता.

यंदा बारावीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. त्याची पुस्तके देखील बालभारतीने छापलेली आहेत. परंतु सध्या ‘लॉकडाऊन’ असल्याने ही पुस्तके बाजारात आणायची कशी, असा प्रश्न सरकारी यंत्रणेने पुढे आहे.

त्यात दुकाने बंद असल्याने पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोचणार कशी, असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकेच नसल्याने विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळात शिकवायचे कसे, अशी विचारणा शाळांकडून केली जाऊ लागली आहे.

कोरोनामुळे विद्यार्थी सक्तीने घरात बसून आहेत. अकरावीतून बारावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ऑनलाइन धडे देण्याचे नियोजन शाळांनी केले होते. मात्र, नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकेच नसल्याने शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करू शकत नसल्याची खंत या शाळांनी व्यक्त केली आहे.

‘बालभारती’चे प्रभारी संचालक विवेक गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “बारावीची सर्व विषयाची पुस्तके छापून झालेली आहेत. परंतु ‘लॉकडाऊन’मुळे ही पुस्तके शाळा वा दुकानांमध्ये पाठविता येत नाहीत. ही पुस्तके शाळांपर्यंत कशी पोचवायची याबद्दल विचार सुरू आहे. शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून यासंबंधी लवकरच निर्णय घेण्यात येईल.”