
नवी दिल्ली: लोकसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून नरेंद्र दामोदरदास मोदी देशाच्या पंतप्रधानपदी सलग दुसर्यानंदा विराजमान झाले आहेत. मोदी – 2 सरकारचे हे मंत्रिमंडळ जम्बो असणार आहे हे स्पष्ट झाले. आज एकूण 58 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
या मंत्रिमंडळाचे वैशिष्ट्यम्हणजे समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले असल्याचे दिसते. मोदी मंत्रिमंडळात सहा महिला मंत्री, घटकपक्षांचे चार मंत्री, एसी आणि एसटी समाजातील दहा मंत्री, उत्तरप्रदेशचे सर्वाधिक आठ मंत्री तर महाराष्ट्राच्या वाट्याला एकूण सात मंत्रीपद आली.
महाराष्ट्रातून राव साहेब दानवे, नितीन गडकरी, संजय धोत्रे, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, सेनेचे अरविंद सावंत, आणि आरपीआयचे रामदास आठवले यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नव्या मंत्री मंडळात एकोणीस जणांनी पहिल्यांदाच शपथ घेतली. स्मृती इराणी या सर्वात कमी वय असलेल्या मंत्री आहेत. 25 कॅबिनेट मंत्री आणि 33 राज्यमंत्री आहेत. लोकसभेतील 45 आणि राज्यसभेतील 13 मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपचे 54 तर घटक पक्षाचे 4 असे एकूण 58 जणांचे मंत्रिमंडळ असणार आहे.
मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यात अनेक देश विदेशातून प्रमुख अतिथी उपस्थित होते. सर्व राजकीय पक्षाचे अध्यक्ष हजर होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच रश्मी ठाकरे हे सर्व जण उपस्थित होते. शपथविधी सोहळा तब्बल दोन तास चालला. अखेरच्या क्षणी जेडीयु मंत्रिमंडळ सहभागी झाला नाही. शरद पवारांनी मात्र या सोहळ्याला उपस्थित न राहून आपली नाराजी व्यक्त केली. शरद पवारांना पाचव्या रांगेत स्थान दिल्याने त्यांनी बहिष्कार टाकल्याची चर्चा आहे.






