
मुंबई – करोनामुळे राज्याचा आर्थिक गाडा ठप्प झाला आहे. लॉकडाउन असल्यानं महसूलाचे सगळे स्त्रोत बंद असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, राज्यातील भाजपा नेत्यांनी पीएम फंडाला निधी जमा केला असून, मदत करण्याचं आवाहनही केलं आहे.
भाजपाच्या कृतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला.
“महापूराच्या काळात सर्वच राजकीय पक्षांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली होती. तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी पीएम फंडाला मदत द्या, असं सांगितलं नाही. आता फडणवीस जर मुख्यमंत्री असते तर त्यांनी पीएम फंडाला निधी द्या, असं सांगितलं असते का?
आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे भाजपाचे नेते असं वागत आहेत का?,” असा सवाल शेट्टी यांनी भाजपा नेत्यांना केला आहे.
राजू शेट्टी म्हणाले,”आज सगळ्यांनी करोनाच्या विरोधात लढण्याची गरज असताना भाजपाचे नेते पोरकटपणे वागत आहेत. त्यांना वेळेचे गांभीर्य नाही.
मुख्यमंत्री फंडाला दिलेली मदत उद्धव ठाकरे घरखर्चाला वापरणार नाहीत किंवा पीएम फंडाला दिलेली मदत पंतप्रधान घरी नेणार नाहीत, हे खरं असलं तरी आज महाराष्ट्र सरकारला पैशांची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आणि उद्योजकांनी मुख्यमंत्री फंडाला मदत करावी,” असं आवाहन शेट्टी यांनी केलं.
“मुख्यमंत्री फंडाला पैशांची गरज असताना भाजपाचे नेते पीएम फंडाला पैसे द्या, असं सांगत आहेत.
हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. मुख्यमंत्री पदावर कोण आहे, हे बघण्यापेक्षा ते घटनात्मक पद आहे. त्या पदाचा मान राखला पाहिजे,पण भाजपावाले असल्या अडचणीच्या काळात सुद्धा सूडबुद्धीनं वागत आहेत.
सत्ता गेल्याचा राग अजून त्यांच्या मनातून गेलेला नाही, हे यातून दिसत आहे,” अशी टीका शेट्टी यांनी केली.











