पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टकडून पीएम केअर व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्रत्येकी दहा लाख रूपयांची मदत

आकुर्डी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर संस्थांनी पुढे येऊन सरकारला आर्थिक मदत करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्ट आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने पंतप्रधानांच्या ‘पीएम केअर’ आणि मुख्यमंत्री यांच्या ‘मुख्यमंत्री रिलीफ फंडास’ प्रत्येकी दहा लाख रुपयांचा मदत निधी देण्यात आला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सभा घेण्यात आली.यावेळी पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्‌माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. नीळकंठ चोपडे, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, एस.बी. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संदीप पाटील, एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी, एस. बी. पाटील आर्किटेक्चरचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, एस. बी. पाटील व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एन. नारायण, पीसीपीच्या प्राचार्या व्ही. एस. बॅकॉड, रजिस्टार योगेश भावसार, लेखाधिकारी सुभाष कानिटकर आदी सहभागी  झाले होते.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी ‘पीएम केअर’ आणि ‘मुख्यमंत्री रिलीफ फंडा’स प्रत्येकी दहा लाख असा वीस लाख रुपये निधी देण्याचा ठराव मांडला त्यास सर्व विश्वस्त मंडळाने अनुमोदन दिले. त्यानंतर ही २० लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.

अध्यक्ष लांडगे म्हणाले, “कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या संकटाचे प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी संधीमध्ये रुपांतर करावे. यासाठी संस्थेने ‘लीडर स्पीक’ नावाने फेसबुक लाईव्ह व्दारे आधुनिक संकल्पनांचा वापर करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व काही ‘ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स’ सुरु केले आहेत. त्यासाठी आवश्यक ते तांत्रिक सहाय्य प्राध्यापकांना उपलब्ध करून दिले आहे. याचा अनेक विद्यार्थी लाभ घेत आहेत. तसेच यामध्ये संस्थेचे माजी विद्यार्थी देखील सहभागी होत आहेत. त्यांच्या अनुभवांचा फायदा नवीन विद्यार्थ्यांना होत आहे.”