
मुंबई : भारतात क्रिकेटच्या चाहत्यांची मोठी संख्या आहे. भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते. कोरोनामुळे आयपीएलवर पाणी फेरल्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे.मात्र आता भारतीय क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाऊ शकतो अशी चर्चा सुरु झाली आहे.
भारत-आफ्रिका या दोन्ही संघांच्या दरम्यान ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाऊ शकते. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघाच्या आफ्रिका दौऱ्याची शक्यता अधिक आहे. अर्थात यासाठी पहिली अट करोना व्हायरसची परिस्थिती नियंत्रणात असने ही होय. आफ्रिका दौऱ्यात कदाचीत ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेचा विचार केला जाऊ शकतो. कारण त्याच काळात भारताचा झिम्बाब्वे दौरा आहे. भारत झिम्बाब्वेविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला करोनामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) १ जुलैपर्यंत देशांतर्गत सर्व स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरासुद्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आला आहे.
भारत-इंग्लंड महिला संघांमध्ये २५ जूनपासून चार एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका रंगणार होती. ट्वेन्टी-२० सामने टाँटन आणि ब्रिस्टॉल येथे तर चार एकदिवसीय सामने वुर्सेस्टर, चेल्म्सफोर्ड, कँटरबरी आणि होव्ह येथे खेळवण्यात येणार होते. ९ जुलैपर्यंतच्या या दौऱ्यानंतर भारतीय महिला संघ मायदेशात श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. परंतु या मालिकेबाबतसुद्धा अद्याप संभ्रम कायम आहे.











