शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र आहे,नक्कीच कोरोनावर मात करेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवारी) फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना आपण कोरोनाच्या संकटावर लवकर मात करू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधताना औरंगाबाद, करमाड येथे घडलेल्या मालगाडी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला.परप्रांतीय मजुर व इतर कामगारांनी असुरक्षित प्रवास करू नये तसेच राज्य सरकार त्यांना सुरक्षित घरी पोहचवण्यासाठी व्यवस्था करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे स्थलांतर करणार्या नागरिकांनी सयंम पाळावा असे आवाहन त्यांनी केले.

मुंबई मध्ये लष्कराला पाचारण करणार नाही त्याची गरज नसून मुंबई मध्ये जे काही करू ते लोकांना विश्वासात घेऊन करणार असल्याचे ते म्हणाले. गुरुवारी (दि.७) रोजी झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून सर्वांनी सरकारला साथ देण्याची हमी दिली आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, लष्काराचे हाॅस्पीटल, डाॅक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी पुढचा धोका लक्षात घेऊन काही काळासाठी राज्याच्या ताब्यात देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांना टप्प्या टप्प्याने विश्रांती देण्यासाठी जर अधिकच्या मनुष्यबळाची गरज भासली तर केंद्राने ती गरज सुद्धा पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कंटेनमेंट झोन मध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता दिली जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या लोकांना कोरोना संबंधित लक्षणे दिसत आहेत त्यांनी स्वत: रूग्णालयात दाखल व्हावे आणि माहिती द्यावी. रूग्णांनी शेवटच्या टप्प्यात येऊन माहिती देणं योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

होमिओपॅथी आणि आयुष विभागाच्या हाॅस्पीटल, डाॅक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचार्यांना या लढाईत पुढे येण्याचे व एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

लाॅकडाऊनचे काय करायचे ते आता नागरिकांनी ठरवायचे आहे, लोकांनी जर शिस्त आणि संयम पाळला तर या संकटातून लवकर बाहेर पडू असे ठाकरे म्हणाले. कोरोनाबरोबर जगण्याची गरज नसून आपण यावर निश्चित मात करू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.