चक्रीवादळात घडले देवदूताचे दर्शन ; मुंबई पोलिसांनी वाचवले चिमूरडीचे प्राण

मुंबई – कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे आधीच विरळ झालेले मुंबईतील रस्ते कालच्या चक्रीवादळामुळे अगदी निर्मनुष्य झाले होते. या पार्श्वभूमीवर एका ‘देवदूता’चे दर्शन घडले. जनतेच्या रक्षणासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या पोलीस दलातील हवालदार आकाश गायकवाड यांनी ऐन गरजेच्या वेळी रक्तदान करून एका लहान मुलीला जीवदान दिले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांना याची माहिती मिळताच त्यांनी हवालदार गायकवाड यांना दूरध्वनी करून ‘आकाश तुझा आम्हाला अभिमान आहे’, अशा शब्दांत त्याचे अभिनंदन केले. श्री. गायकवाड यांच्यासारख्या योद्ध्यांना माझा सलाम! पोलीस कुटुंबाचा प्रमुख म्हणून मला आपल्या पोलीस दलाचा अभिमान आहे, असे भावोद्गारही त्यांनी यावेळी काढले.

विश्वासाची वर्षपूर्ती म्हणत अमोल कोल्हेंनी एका वर्षाच्या कामाचं रिपोर्टकार्ड सादर केलं
पोलीस ब्रीदवाक्यास अनुसरून त्यांनी रक्तदान केले आणि या मुलीला जीवनदान मिळाले. स्वप्नवत घडणाऱ्या या घटनेतून माणुसकी हाच धर्म श्रेष्ठ असल्याची प्रचिती रुग्णालयातील उपस्थितांना आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हवालदार आकाश गायकवाड यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
 
१४ वर्षाच्या सनाफातिम खानला ओपन हार्ट सर्जरी साठी तात्काळ A+ रक्ताची गरज होती. कालच्या वादळामुळे तिचे नातेवाईक येऊ न शकल्याने ड्यूटीवर असलेले #पोलीस कॉन्स्टेबल आकाश गायकवाड यांनी तत्परतेने रक्तदान करून तिचा जीव वाचवला आहे. त्यांच्या या कार्याचे करावे तेव्हढे कौतुक कमी आहे.