राज्यातील विद्यापीठात पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाहीच – उदय सामंत

राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेऊन, महाराष्ट्र सरकारनं व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाही, असा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयानं यासंबंधीचा शासन निर्णय जाहीर केलाय.

तसंच, अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे आहे, त्यांच्याकडून तसे लिखित स्वरुपात घेऊन विद्यापीठांनी योग्य ते सू्त्र वापरून निकाल घोषित करावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयानं दिल्यात.

मात्र, ज्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग आहे, त्यांच्या बॅकलॉगच्या विषयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित अधिकाऱ्यांची शासनस्तरावर बैठक घेऊन विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येईल, असेही शासन निर्णयात सांगण्यात आले आहे.