पालिकेचा आदेश धुडकावत दुकान चालु ठेवणाऱ्यांविरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !

कल्याण – पालिकेचा आदेश धुडकारून एका मटण विक्रेत्याने आपले दुकान चालु ठेवल्या प्रकरणी प्रभाग ड क्षेत्र अधिकारी श्री.वसंत भोंगाडे यानी संबंधीत दुकानदारा विरोधात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा कलम १८८ नुसार कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . या मुळे नियमांचे उलंघन करणाऱ्या व्यापारी वर्गाचे धाबे दणाणले आहेत .

पालिका सुत्रांकडून मिळालेल्या माहीती नुसार कोरोना विषाणुमूळे पसरत असलेल्या आजारावर कल्याण डोंबिवलीमहानगरपालिके मार्फत आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहे. या आजारावर नियंत्रण मिळविणेकामी कटेन्टमेंट झोनबाहेरील क्षेत्रांमध्ये (मॉल/ शॉपींग कॉम्प्लेक्स मधील दुकाने वगळून) रस्त्यांच्या दोन्ही बाजूनी सम विषम तारखेप्रमाणे (P1.P2) दररोज संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत दुकाने/ व्यवसाय सुरु ठेवण्यांस परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु काही व्यावसायिक महापालिकेचे आदेश न पाळता दैनंदिन व्यवसाय सुरु ठेवत असल्यामुळे अशा व्यावसायिकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी
दिले आहे.

कल्याण पुर्वेतील ५ ड प्रभागाच्या कार्यक्षेत्राच्या परिसरात वरील प्रमाणे आदेश डावलून विनापरवानगी व्यवसाय करित असलेल्या व्यावसायिकांविरुध्द श्री. वसंत भोंगाडे, प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी त्यांचे पथकासह कारवाई सुरु केली आहे.सदर कारवाई करत असतांना पुणे लिंक रोड वरील अपर्णा डेअरी चौकातील दोन मटन विक्रेते यांना वारंवार सुचना देवून देखिल व्यवसाय बंद करीत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे दोन्ही मटन विक्रेत्यांविरुध्द कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड सहिता कलम १८८ व महाराष्ट्र कोविड उपाय योजना २०२० चे नियम ११ नुसार (गुन्हा दाखल क्र. ०३५२ दि. २८/६/२०२०) गुन्हा दाखल करण्यांत आलेला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी व व्यावसायिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे, आजाराचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी आवश्यक ती संपूर्ण काळजी घ्यावी, कामाशिवाय घराबाहेर पडू नये व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.