मुंबईत कोसळधार, आजही मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड येथे अतिवृष्टीचा इशारा

आज सकाळपासूनच पावसाने चांगला जोर धरला असून मुंबई आणि उपनगरांना झोडपून काढलं आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्यानं शनिवारीही मुंबई शहर आणि उपनगरातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला असून सकाळी ११ वाजून ३६ मिनिटांनी समुद्रात ४.४ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

जून महिन्याच्या सुरुवातीलाच निसर्ग चक्रीवादाळामुळे महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी झाली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने सुरुवातीपासूनच जोर धरला होता, मात्र मुंबईसह अनेक शहरांत जून महिना कोरडाच गेला. त्यामुळे मुंबईत कालपासून बरसणारा हा पाऊस शनिवारीही कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच, मुंबई महानगरपालिकेनंही २४ विभाग कार्यालयातील सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार शनिवारी मुंबईसह रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतही रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय नाशिक, पुणे येथे घाट विभागांमध्येही रेड अॅलर्ट आहे. सध्या गुजरात आणि जवळच्या परिसरामध्ये चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवस ही स्थिती कायम राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.