रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून भाजप नेते बाळासाहेब घोटाकुले यांना लुबाडले

मावळ,पुणे – रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष व मावळ तालुका भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले यांना लुबाडल्याची धक्कादायक घटना काल (शनिवार) आढले बुद्रुक येथे घडली. या वेळी चोरट्यांशी झालेल्या झटापटीत त्यांचे बंधू किरकोळ जखमी झाले.  

ही घटना त्यांच्या राहत्या घरासमोर आढले बुद्रुक येथे काल (शनिवार) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली.या संदर्भात बाळासाहेब घोटकुले यांनी शिरगाव पोलीस चौकी येथे रात्री उशिरा फिर्याद दाखल केली.

शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटकुले हे आपल्या घराजवळ रात्री सव्वानऊच्या सुमारास शतपावली करत असताना पाच चारचाकी वाहनांमधून आलेल्या ८-९ जणांच्या टोळक्यांनी त्यांना घेरले व डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून गळ्यातील चार तोळ्यांची चैन व तीन तोळ्यांचे ब्रेस्लेट जबरदस्तीने काढून घेतले. यावेळी मदतीसाठी आलेले बंधू भाऊसाहेब घोटकुले यांना झटापटीत ओठाला किरकोळ मार लागून जखमी झाले. यानंतर हल्लेखोर पसार झाले.

या घटनेतील आरोपींचा शोध शिरगाव पोलीस  कसून शोध घेत आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात यश येईल, असे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी सांगितले.