भारताचं लक्ष असलेली ‘कोव्हिशिल्ड’ ही लस पुन्हा एकदा वादात ?

पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट’ उत्पादित करत असलेल्या आणि ‘ऑक्सफर्ड विद्यापीठ’ आणि ‘एस्ट्राझेनेका’ यांनी संशोधन केलेल्या या लशीच्या गंभीर परिणामांबाबत चेन्नईस्थित एका स्वयंसेवकानं दावे आणि आरोपही केले आहेत.

या लशीच्या भारताच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांमध्ये लस टोचून घेतल्यानंतर आपल्याला मेंदूचा गंभीर आजार झाल्याचं या व्यक्तीचं म्हणणं आहे आणि त्यासाठी त्यानं 5 कोटी रुपये भरपाईची मागणीही केली आहे, तर ‘सीरम इन्स्टिट्यूट’नं हे दावे फेटाळून लावत या आरोपांबद्दल 100 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं आहे.

चेन्नईमध्ये उद्योग सल्लागार म्हणून स्वतंत्र काम करणाऱ्या या 40 वर्षीय पुरुष स्वयंसेवकानं त्यांच्या वकिलांमार्फत नोटीस जारी केली आहे.

कोव्हिशिल्ड’ या लशीची तिसऱ्या टप्प्यातले युरोप आणि अमेरिकेतल्या हजारो स्वयंसेवकांवर झालेल्या चाचण्यांचे निकाल उत्साहवर्धक असल्याचं ‘ऑक्सफर्ड’नं नुकतंच जाहीर केलं होतं.

‘सीरम’ तर्फे भारतातल्याही 1500 स्वयंसेवकांवर या तिसऱ्या टप्प्यात चाचण्या केल्या जात होत्या. जारी केलेल्या नोटिशीत म्हटल्याप्रमाणे, त्या टप्प्यादरम्यानच 1 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ‘श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन’ जिथं या चाचण्यांचं आयोजन केलं होतं त्यात या व्यक्तीनं ही लस टोचून घेतली.

या नोटिशीत स्वयंसेवकाने केलेल्या दाव्याप्रमाणे या ‘कोव्हिशिल्ड’ लशीमुळे त्याच्या मेंदूच्या कार्यात गंभीर बिघाड झाला आहे आणि त्याला अनेक मानसिक अडचणींनाही सामोरं जावं लागत आहे.

दुसऱ्या बाजूला ‘कोव्हिशिल्ड’ लशीची भारतासाठी मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणाऱ्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’नं हे दावे खोटे आणि चुकीच्या भावनेतून केले असल्याचा प्रतिआरोप केला आहे.