
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने आणखी एक धक्का दिला आहे. प्रताप सरनाईक यांचे धाकटे पूत्र पूर्वेश सरनाईक हेही ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे पूर्वेश सरनाईक यांनाही ईडीने नोटीस बजावल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. (MLA Pratap Sarnaik Son Purvesh Sarnaik On ED radar)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रताप सरनाईक यांचे धाकटे सुपूत्र पूर्वेश सरनाईक यांना गुरुवारी (10 डिसेंबर) ईडीने नोटीस बजावली आहे. यात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहाराबाबत ही चौकशी करण्यात येत आहे. तसेच यात आणखी काही परदेशी व्यवहारही झाले आहेत, याचीही ईडीकडून चौकशी केली जात आहे.
दरम्यान याआधी ईडीकडून प्रताप सरनाईक आणि मुलगा विहंग सरनाईक यांना नोटीस बजावण्यात आली होती. यात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही दिले होते. तसेच गुरुवारी (10 डिसेंबर) ईडीच्या अधिकाऱ्यांकडून प्रताप सरनाईक यांची चौकशीही करण्यात आली. यावेळी तब्बल सहा तास त्यांची चौकशी चालली. या चौकशीत त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले.











