भारतात कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकाराचा शिरकाव

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार स्ट्रेनचे रुग्ण आता भारतातही आढळले आहेत. सहा भारतीयांना कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनची लागण झाल्याचे समोर आले आहे.

युकेमधून भारतात परतलेल्या सहा व्यक्तींना आता विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. इतर काही देशांप्रमाणे भारताने गेल्या आठवड्यापासून युकेत जाणारा-येणारा विमान प्रवास बंद करण्यात आला आहे.

आधीच्या कोरोना व्हायरसपेक्षा नवीन स्ट्रेन हा अधिक वेगाने पसरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पण नवीन स्ट्रेन अधिक धोकादायक असेलच असे नाही असंही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकाराची लागण झालेल्या सहा भारतीयांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना शोधण्याचे काम सुरू आहे.

देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर युकेतून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांची RT-PCR टेस्ट करण्यात येत आहे.

कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे नमुने जिनोम सीक्वेंससाठी सरकारमान्य प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात. याठिकाणी नवीन स्ट्रेनची लागण झाल्याचे निष्पन्न होते.

गेल्या महिन्याभरात युकेहून 33 हजार प्रवाशी भारतात पोहचले आहेत. यापैकी 114 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. अशा सर्वांचे नमुने जीनोम सीक्वेंसिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात.

कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार समोर आल्याने जगभरात पुन्हा एकदा पर्यटनावर निर्बंध लावण्यात आले आहेत. आतापर्यंत कॅनडा, जपान, स्पेन, स्वीडन आणि फ्रांसमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळला आहे.