
ऑस्ट्रेलियाने दिलेलं 407 रन्सच्या लक्ष्यासमोर खेळताना टीम इंडियाने चौथ्या दिवसअखेर 98/2 अशी मजल मारली होती.
पाचव्या दिवशी कर्णधार अजिंक्य रहाणेला नॅथन लियॉनने बाद केलं. यानंतर संघव्यवस्थापनाने हनुमा विहारीऐवजी ऋषभ पंतला पाठवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात बॅटिंग करताना ऋषभच्या हाताला दुखापत झाली होती. त्याने कीपिंगही केलं नव्हतं. त्याच्याऐवजी वृद्धिमान साहाने कीपिंग केलं होतं.
पेनकिलर गोळ्या घेऊन खेळत असलेल्या ऋषभने सुरुवातीला बचावात्मक पवित्रा स्वीकारला मात्र थोड्याच वेळात ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सवर आक्रमणाला सुरुवात केली. ऋषभच्या आक्रमणाने ऑस्ट्रेलियाचे बॉलर्स गोंधळून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं.
ऋषभने 118 बॉलमध्ये 12 चौकार आणि 3 षटकारांसह 97 रन्सची सनसनाटी खेळी केली. नॅथन लियॉनने त्याला बाद केलं. ऋषभ-पुजारा जोडीने चौथ्या विकेटसाठी 148 रन्सची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टेस्टमध्ये शतक करण्याचा विक्रम ऋषभ पंतच्याच नावावर आहे. दोन वर्षांपूर्वी ऋषभने सिडनीतच 159 खेळी केली होती.
टेस्ट सीरिजपूर्वी झालेल्या सराव सामन्यातही ऋषभने सिडनीतच शतक झळकावलं होतं.
टेस्ट क्रिकेटमध्ये 400पेक्षा जास्त रन्सचा पाठलाग चारवेळा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियातच 414 रन्स केल्या होत्या.
दरम्यान सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 रन्स केल्या. स्टीव्हन स्मिथने 131 रन्सची शतकी खेळी केली. स्मिथचं हे 27वं शतक आहे. मार्नस लबूशेनने 91 तर विल प्युकोव्हस्कीने 62 रन्सची खेळी केली. रवींद्र जडेजाने 4 विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना, टीम इंडियाचा डाव 244 रन्समध्येच आटोपला. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी प्रत्येकी 50 रन्सची खेळी केली. ऑस्ट्रेलियातर्फे पॅट कमिन्सने 4 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी 312/6वर डाव घोषित केला. मार्नस लबूशेनने 73, स्टीव्हन स्मिथने 81 तर कॅमेरुन ग्रीनने 84 रन्सची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 407 रन्सचं लक्ष्य दिलं.
दुखापती आणि भेदक मारा यांची पर्वा न करता टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची सिडनी टेस्ट अर्निणित केली. हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन यांनी तीन तासापेक्षा जास्त वेळ किल्ला लढवत खिंड लढवली.
ही टेस्ट अर्निणित झाल्याने सीरिज 1-1 बरोबरीत आहे. अॅडलेड टेस्ट ऑस्ट्रेलियाने तर मेलबर्न टेस्ट भारताने जिंकली होती. चौथी टेस्ट ब्रिस्बेन इथे होणार आहे.
पाचव्या दिवशी 96/2 वरून पुढे खेळणाऱ्या टीम इंडियाने कर्णधार अजिंक्य रहाणेला झटपट गमावलं. मात्र त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी मॅरेथॉन भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकलं.
पुजाराने अभेद्य बचाव आणि ऋषभने आक्रमक पवित्रा स्वीकारला. पंतने 97 रन्सची वादळी खेळी केली. पंत बाद झाल्यानंतर टीम इंडियाने पुजारालाही गमावलं. टीम इंडियाचा पराभव दिसू लागला होता.
मात्र हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन यांनी ऑस्ट्रेलियाच्या तिखट माऱ्याला तोंड देत दुखापतींवर मात करत साडेतीन तास चिवटपणे लढत दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी बॉल खेळून काढले. मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे विहारीला धावता येत नव्हतं. ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनी अश्विनला बाऊन्सरने लक्ष्य केलं.
या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 259 बॉल खेळून काढत 62 रन्स केल्या आणि मॅच वाचवली.











