विराट कोहली, अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला (Anushaka Sharma) कन्यारत्न प्राप्त झाले आहे. विराटने स्वतः ट्विटरच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आज 11 जानेवारी 2021 रोजी ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये (Breach Candy Hospital) अनुष्काने बाळाला जन्म दिला आहे. यानंतर बॉलिवूड आणि क्रिडा विश्वासह त्यांच्या चाहत्यांनीही ट्विटर (Twitter), फेसबूक (Facebook), इंस्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

“आम्हा दोघांना हे सांगण्यास आनंद होत आहे की, आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाला आहे. तुमच्याकडून मिळालेले प्रेम आणि शुभाशीर्वादांसाठी आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघेही सुखरुप आहेत. आम्हाला आयुष्याचा हा टप्पा अनुभवायला मिळाला, हे आमचे सुदैवच. आम्हाला या क्षणी प्रायव्हसी जपायची आहे, हे तुम्ही समजून घ्याल, अशी आशा आहे”, असे ट्विट विराट कोहलीने केले आहे.