कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


“महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद – संघर्ष आणि संकल्प” पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.


“कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच,” असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. “मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल पडलं पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत.

बेळगाव महाराष्ट्रात घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा आपली भूमिका मांडली आहे. तसेच जोपर्यंत हे प्रकरण कोर्टात आहे तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित प्रदेश का केला जाऊ नये असा प्रश्न त्यांनी विचारला.

कर्नाटक सीमाप्रश्नावर आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह अन्य मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीआधी प्राध्यापक दीपक पवार यांचं सीमा प्रश्नावर आधारित असलेल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं.

बेळगाव आणि सीमाप्रश्नाची चर्चा महाराष्ट्रात सातत्यानं होत असते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात हा मुद्दा राजकीयदृष्ट्याही संवेदनशील आहे.