
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) देशभरातील शेतक-यांच्या विविध मागण्यासाठी पुन्हा एका उपोषणाला बसणार आहेत. येत्या 30 जानेवारीपासून म्हणजेच महात्मा गांधीच्या पुण्यतिथीपासून या उपोषणाला सुरुवात करणार आहेत. राळेगणसिद्धी (Ralegan-Siddhi) येथून या उपोषणाला सुरुवात होईल.
याबाबतचे एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यात आपल्या उपोषणाला पाठिंबा देणा-या आपल्या समर्थकांनी तुम्ही आहात त्या ठिकाणाहून यात सहभागी व्हावे असे आवाहन अण्णा हजारे यांनी केले आहे. शेतक-यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या यासाठी अण्णा हजारे यांनी उपोषणाचा बडगा उचलला आहे.
अण्णा हजारे यांनी लिहिलेल्या या पत्रकात, “वारंवार आम्ही सरकारकडे आमच्या मागण्या मांडल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांना मी पाच वेळा पत्र लिहिलं. सरकारचे प्रतिनिधी इथे येऊन चर्चा करत आहेत.
मात्र, अद्याप या मागण्यांवर कोणताही योग्य तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आता मी ३० जानेवारी २०२१ रोजी महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी दिनी राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात उपोषणाला बसणार आहे” असे म्हटले आहे










