
आजची माहिती
झटके का येतात ? त्यावर उपाय काय ?
एखाद्या रुग्णाला झटके आले की आजूबाजूचे लोक सर्व भांबावून जातात. त्यांना काय करावे तेच कळत नाही. मग कोणी त्या व्यक्तीच्या नाकाला कांदा फोडून लावतात किंवा चप्पल नाकाजवळ नेतात. काही जण थाड थाड उडणारे त्याचे हात पाय दाबून धरण्याचा प्रयत्न करतात. काही जण त्याला पाणी पाजायचा प्रयत्न करतात.
झटके का येतात ते आता समजावून घेऊ.
मेंदूतील पेशींच्या अचानक उद्भवणाऱ्या अतिरिक्त उद्दीपनांमुळे झटके येतात. लहान मुलांमध्ये खूप ताप आणि जुलाब हगवणीमुळे होणारे गंभीर निर्जलीकरण या दोन कारणांमुळे सामान्यतः झटके येतात. मेंदूदाह, मेंदूवर परिणाम करणारा हिवताप, काही विषबाधा इत्यादींमुळे आजारी माणसामध्ये झटके येतात. मिरगी किंवा अपस्मार या रोगात उपचार न घेतल्यास वारंवार झटके येतात.
झटके का येतात हे कळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, त्यावर कारणानुरूप उपचार करावे लागतील. म्हणूनच तुमच्या घरात किंवा आसपास कोणाला असा त्रास झाला तर तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. भानामती, जादूटोणा, करणी इत्यादीमुळे झटके येताहेत असे कोणी म्हटले तर त्याचे ऐकू नका. या अंधश्रद्धेतून रुग्ण दगावण्याची शक्यता असते. मिरगी या रोगासाठी फेनोबार्बीटोन, फेनोटॉईन सोडियम, कार्बामॅझेपीन यांसारखी प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. फक्त उपचार नियमितपणे घ्यायला हवेत.
झटके आलेल्या व्यक्तीला अपायकारक वस्तूंपासून किंवा परिस्थितीपासून दूर न्यावे. त्याला प्यायला किंवा खायला देऊ नये. त्याच्या तोंडात कापडात गुंडाळून लाकडी पट्टी ठेवावी म्हणजे जिभेला चावा बसणार नाही. झटके येत असताना त्याचे हातपाय दाबून धरू नयेत. चप्पल व इतर अस्वच्छ पदार्थ उपचारासाठी वापरू नका. झटके आलेल्या व्यक्तीला नंतर डॉक्टरांकडे न्यावे व उपचार सुरू करावे.
संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
डॉ. जगन्नाथ दीक्षित
डाॅ. अंजली दीक्षित
यांच्या ‘मेडिकल जनरल नॉलेज’ या पुस्तकातून











