
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून तरे यांची विशेष ओळख होती. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या महापौरपदाच्या कारकीर्दीमध्ये ठाणे शहराचा विकास आराखडा आखण्यात आला.
विरोधकांकडून महापौरपद खेचून आणून महापौरपदाची हॅट्ट्रिक करणारे महापौर म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती. अत्यंत अभ्यासपूर्ण असे त्यांचे वक्तृत्व होते. महापौर म्हणून काम करत असताना त्यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना बरोबर घेवून ठाण्याचा विकास केला. संघटनेच्या माध्यमातून त्यांच्यावर शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती व ते काही काळ विधानपरिषदेचे आमदार म्हणून कार्यरत होते.
मुंबई, ठाणे या परिरातील मूळ रहिवाशी असलेल्या कोळी समाजाला राजकीय पटलावर एकत्र करून कोळी समाजाची एकसंघ मोठी ताकद शिवसेनेशी जोडण्याचे काम अनंत तरे यांनी केले.
अनंत तरे यांच्या निधनाने मुख्यमंत्री भावुक झाले. त्यांनी नेमक्या शब्दांत अनेक तरे यांच्यातील सच्चा शिवसैनिक उलगडून सांगितला. ‘ठाण्याचे शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक अनंत तरे गेले. कोविड योद्धा अखेर कोविडने आपल्यातून हिरावून नेला. अनंत तरे म्हणजे ठाण्यातला सच्चा कार्यकर्त्ता. शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी द्यायची आणि अनंत तरे यानी ती निभावायची आणि त्यांना सर्व कोळी समाजातील बांधवांनी, शिवसैनिकांनी साथ द्यायची हे जणू ठरलेले समीकरणच.शिवसेनेचा हा निष्ठावान कार्यकर्ता आज अनंतात विलीन झाला आणि खरेच तारा म्हणून आकाशगंगेत सामावला. अनंता आता तुला कोण पाहू शकणार नाही पण तुझी स्मृती कायम आम्हा शिवसैनिकांच्या स्मरणात राहील, खरंच अनंत तरे यांच्या निधनाने शिवसेना कुटुंबातील एक तारा निखळला आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन’, अशा शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.






