श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान या नव्या संघटनेची घोषणा

संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेमध्ये गेले काही दिवस वाद सुरू होता. या संघटनेतील नितीन चौगुले यांच्याबाबत आलेल्या काही तक्रारीच्या पार्श्वभूमीवर त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळेचे चौगुले यांनी नवीन संघटनेची स्थापना केली असून शिवप्रतिष्ठानमध्ये उभी फूट पडल्याचेही स्पष्ट झाले आहे. सांगली येथे मेळावा घेऊन चौगुले यांनी नव्या संघटनेची घोषणा केली. 

नवीन संघटनेबाबत बोलताना ते म्हणाले, ‘हिंदुत्व हेच या संघटनेचे मुख्य केंद्र राहील. बेरोजगार युवकांना रोजगार देण्याबरोबरच हिंदुत्व चळवळीत काम करताना ज्यांच्यावर खटले दाखल होतील त्यांना सोडवण्यासाठी वकिलांची फौज उभी केली जाईल. शिवाजी महाराजांसोबतचे जे मावळे लढायांत धारातीर्थी पडले त्या मावळ्यांच्या दुर्लक्षित समाधींचा शोध घेऊन तेथे स्मारक बांधण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून दरवर्षी एक स्मारक बांधण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला.